Sagara pran talmalala

सागरा, प्राण तळमळला
- विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar)

ने मजसी ने परत मातृभूमीला,
सागरा, प्राण तळमळला

भूमातेच्या चरणतला तुज धूता,
मी नित्य पाहीला होता
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ,
सृष्टिची विविधता पाहू
तइं जननीहृद् विरहशंकीतहि झाले,
परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन,
त्वरि तया परत आणीन
विश्र्वसलो या तव वचनी मी,
जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्त उद्धरणी मी,
येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला
सागरा, प्राण तळमळला

शुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी,
ही फसगत झाली तैसी
भूविरह कसा सतत साहू या पुढती,
दश दिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे,
की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा,
हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे,
नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाब ही आता रे,
फुलबाग मला, हाय, पारखा झाला
सागरा, प्राण तळमळला

नभि नक्षत्रे बहुत,
एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा
प्रसाद इथे भव्य,
परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य,
मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे,
बहुजिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे,
तद्विरहाची शपथ घालितो तुजला
सागरा, प्राण तळमळला

या फेनमिषें हससि निर्दया कैसा,
का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते,
भिऊनि का आंग्ल भूमी ते
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी,
मज विवासना ते देती
तरि आंग्लभूमि भयभीता रे,
अबला न माझी ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे,
जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळला

Comments

  • deepti
    16 Jan 09
    this poem was recited by Vinayak bt this is my faviourite poem....hum honge kamyab....